गुरुवर्य चैतन्यस्वरूप श्री. भालचंद्र दत्तात्रय लिमये, म्हणजेच आमच्या सर्वांचे अण्णा तसेच लक्ष्मीस्वरूप सुषमा भालचंद्र लिमये म्हणजेच आमच्या सर्वांच्या आई. हे दोघेही श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, गोविंदानंद श्रीराम मंदिर, नंदकिशोर संस्कार केंद्र या तीनही संस्थांचे तसेच श्री स्वामी समर्थ धार्मिक ग्रंथालयाचे व विश्वनाथ मेमोरियल चिल्ड्रेन हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर या नियोजित प्रकल्पाचे आधारस्तंभ. १९७४ साली श्री स्वामी समर्थांच्या चरण स्पर्शित प्रासादिक पादुकांचे ति. अण्णांच्या राहत्या घरी (गणेशकृपा) आगमन झाले व या जागेचे मठात रूपांतर झाले व हजारोंच्या श्रद्धेचे ते श्रद्धास्थान बनले. पादुकांच्या पाठोपाठ आले ते श्री अक्कलकोट स्वामींचे, श्री रघुवीर मुळगांवकर यांनी काढलेले भव्य असे तैलचित्र.
एवढे मोठे कार्य करण्यासाठी त्याची योजनाबद्ध आखणी असावी व सरकार दरबारी याची दखल असावी व समाज विश्वास निर्माण व्हावा म्हणून १२ जून १९८४ रोजी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाची स्थापना केली.
दर गुरुवारी होणारी आरती व त्यासाठी होणारी भक्तांची अमाप गर्दी. घरातली जागा कमी पडू लागल्याने, आरती पुरती किंवा एखादी सभा घेण्यापुरती व्यवस्था व्हावी या दृष्टीने परवानगी घेऊन उपलब्ध झालेल्या श्री गोविंदानंद श्रीराम मंदिरात म्हणजेच स्टेशनजवळील मठात उत्तम व्यवस्थापन, उत्तम शिस्तपालन याचे आदर्श घालून देऊन ते श्रीराम मंदिर सर्वतोपरी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाकडे सुपूर्त करावे असे वाटेल, असे उत्कृष्ट कार्य प. पु. सद्गुरू ति. अण्णा व ति. आईंनी करून दाखवले व सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून ते मंदिर श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या ताब्यात आले.
समाजात वाचनाभिमुख करण्याच्या हेतूने उत्तम ग्रंथांनी सुसज्ज असे श्री स्वामी समर्थ धार्मिक ग्रंथालय १९८८ साली स्थापन केले.केवळ धार्मिक करण्यापुरते मर्यादित न राहता उमलत्या पिढीवर उत्तम सुसंस्कार व्हावेत म्हणून १९९३ साली नंदकिशोर संस्कार केंद्राची स्थापना केली
याच काळात समर्थांच्या मठवास्तुसाठी प्रयत्न सुरु होते व १९९६ साली नांदिवली येथील जागा मठासाठी निश्चित करून भूमिपूजन केले व ३१ डिसेंबर १९९८ साली या मठवास्तूचे कळसपूजन व उदघाटन हि केले. हि भव्य वास्तू आता डोंबिवलीचे भूषण आहे.
श्री गोविंदानंद श्री राम मंदिर ताब्यात आल्या नंतर मंदिराचे कामकाज यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी त्या जागी संरचनेची योजना तयार करणे अत्यंत आवश्यक होते.त्यानुसार, २०१५ साली श्री गोविंदानंद श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाने हाती घेतले व सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून २६ डिसेंबर २०१५ रोजी भूमिपूजन केले व दिनांक १५, १६ व १७ मार्च २०१९ त्या मंदिरातील सर्व देवदेवतांची प्राणप्रतिष्ठा करून १९ एप्रिल २०१९ रोजी कळसपूजन व मंदिर उदघाटन केले.
याचबरोबर ति. अण्णा व ति. आई ह्यांचे अजून एक स्वप्न आहे ते म्हणजे 'विश्वनाथ मेमोरियल चिल्ड्रेन हॉस्पिटल' लहान मुलांवर अत्यंत कमी दरात उपचार व्हावेत या दृष्टीने सुरु होणारा हा प्रकल्प योग्य दिशेने पुढे जात आहे