सद्गुरु चैतन्यस्वरुप तीर्थरूप भालचंद्र दत्तात्रय लिमये उपाख्य “अण्णा” तसेच लक्ष्मीस्वरुप तीर्थरुप सुषमा भालचंद्र लिमये उपाख्य “आईंची” मठ उभारणीची स्वप्नपूर्ती.
ही मठवास्तू म्हणजे अध्यात्मिक, वैज्ञानिक व समाजोपयोगी कार्य अशा त्रिविध उद्देशांचा सुरेख असा संगम आहे.
मठाच्या प्रवेशद्वारातून आत शिरतांना मनात भरते ती मठाची भव्य वास्तू. रुढ अर्थाने ज्याला देऊळ म्हणतात तसे हे देऊळ वाटत नाही. खऱ्या अर्थाने हा “मठ” आहे असे जाणवते.
त्याचे कारण या मठाचे विशिष्ट असे बांधकाम. मुख्य म्हणजे हा मठ आहे माणसांच्या गर्दीपासून दूर. येथील निरव शांतता प्रकर्षाने जाणवते व मठात येणाऱ्यांच्या मनात सुद्धा “शांत-भाव” जागृत होतो.
येथे आल्यावर काही काळाने मन:शांती म्हणजे काय याची थोडीशी चुणूक आपल्याला येते व मठासाठी दूर असलेली जागा का निवडली असेल याचे कारण समजते.
तसेच या जागेत खूप वर्षांपूर्वी असंख्य ऋषी-मुनींनी तपश्चर्या केली असून अनेक मंत्रशक्तींच्या लहरींचे नाद आजही येथे घुमत असतात. म्हणूनच सद्गुरूंनी ही जागा मठासाठी निवडली असावी.
मठाच्या बांधकामाचा आराखडा पूर्णपणे नियोजनपूर्वक आणि विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून तयार केला असल्याची प्रचीती प्रत्येक ठिकाणी येते.
मठवास्तूत प्रवेश करताच मनमोहक रांगोळी आपले स्वागत करते. समोरच मठ उद्घाटनाची कोनशिळा दिसते.
पुढे आत्मउन्नतीसाठी नवविधा भक्तीतील श्रवणभक्तीपासून आत्मनिवेदनभक्तीपर्यंत प्रतीकात्मक अशा नऊ पायऱ्या चढल्यानंतर १०८ किलो वजनाची भव्य घंटा दिसते.
या घंटेचा नाद सकाळी ६, दुपारी १२, सायंकाळी ६ व रात्री ९ वाजता होतो आणि दूरवर परिसरात दुमदुमतो.
दर्शन कक्षाच्या दरवाजातूनच श्री स्वामी समर्थांची प्रसन्न व तेजस्वी मूर्ती दिसते.
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” या आश्वासक भावामुळे मूर्ती कुठूनही पाहिली तरी महाराजांची दृष्टी आपल्याकडेच आहे असा अनुभव येतो.
भव्य गाभाऱ्यात चांदीच्या सिंहासनावर (मूळ शिसवी) विराजमान झालेली महाराजांची मूर्ती दर्शनास येते.
गाभाऱ्यातील चौथऱ्यावर सिंहासनावरील छत्री, अखंड तेवणारा नंदादीप, महाराजांना प्रिय असणारी गुडगुडी, भगवा ध्वज, तांब्या-भांडे आणि चांदीच्या पादुका यांचा समावेश आहे.
गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस चैतन्यस्वरुप सद्गुरु अण्णा यांची प्रतिमा व पादुकांचे दर्शन घडते.
उजव्या बाजूस अण्णांना मिळालेली मानपत्रे व त्यांच्या स्पर्शातील वस्तूंचा संग्रह पाहावयास मिळतो.
गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस अनेक ग्रंथांनी समृद्ध असे संदर्भ ग्रंथालय आहे. येथे सुमारे १८०० पेक्षा अधिक अमूल्य व दुर्मिळ ग्रंथ आहेत.
विश्वकोश, संस्कृतिकोश, चार वेद, अवकाशज्ञान, ज्योतिषशास्त्र, ज्ञानेश्वरी, शब्दकोश, होमिओपॅथी अशा अनेक विषयांवरील संदर्भग्रंथ येथे उपलब्ध आहेत.
डॉक्टरेट मिळविणाऱ्या अनेक संशोधकांना ही ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे संदर्भ ग्रंथालय म्हणजे नांदिवली मठरूपी ज्ञानमंदिराचा कळसच आहे.
उजव्या बाजूस कोठीघर आहे.
भक्तांना क्षणभर विश्रांती व मन:शांती देणारे सभागृह म्हणजे “संजीवनी सभागृह”.
येथे विविध क्षेत्रातील कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सभागृहातून वर पाहताच अष्टसिद्धींचे नायक असणाऱ्या अष्टविनायकांच्या मूर्तींचे मनोहारी दर्शन घडते.
प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस दैनंदिन पंचांग व ग्रह-ताऱ्यांची स्थिती दर्शवणारा फलक आहे.
संजीवनी सभागृहातून खाली उतरल्यावर उंबराच्या झाडाखाली महाराजांचा अत्यंत लाडका भक्त मलंग कासवाच्या रूपात स्थिरावलेला दिसतो.
पुढे बहरलेल्या बिल्ववृक्षाखाली सद्गुरुंचे आवडते विसाव्याचे स्थान व महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते.
त्याच पुढे श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली आहे.
पुढे सद्गुरुंच्या हस्ते मौजीबंधन झालेल्या प्राचीन वटवृक्षाचे स्थान आहे.
भक्तरक्षणासाठी सिद्ध असणाऱ्या स्वयंभू श्री काळभैरवांचे मंदिर वटवृक्षासमोर आहे.
त्याच शेजारी “निर्मला - अन्नपूर्णा कुटी” असून जयंती उत्सव व गुरुपौर्णिमेला महाप्रसाद तयार करण्यासाठी ही जागा वापरली जाते.
मांगल्याचे प्रतीक असणारे तुळशीवृंदावनही येथे आहे.
डोंबिवलीतील पाण्याची समस्या लक्षात घेऊन बोअरवेलची व्यवस्था केली आहे.
मठाच्या परिसरात हिरवाईने नटलेली अनेक फुलझाडे असून त्यामुळे परिसर प्रसन्न व सुशोभित दिसतो.
परिक्रमा पूर्ण करून वर आल्यावर पहिल्या मजल्यावर नंदकिशोर संस्कार केंद्राचे कार्यालय आहे.
त्याच्या उजव्या बाजूस दृक-श्राव्य विभाग आहे.
मठात दररोज संध्याकाळी रागचक्रानुसार शास्त्रीय संगीताच्या ध्वनीमुद्रिका लावल्या जातात व त्याची माहिती दर्शनकक्षातील फलकावर दिली जाते.
रागचक्राचे चित्ररूप सादरीकरण व प्रख्यात गायकांच्या घराण्यांची माहिती ही संगीत अभ्यासकांसाठी अमूल्य ठेवा आहे.
या मजल्याच्या मध्यभागी साडेतीन शक्तीपीठातील चार देवींचे सुंदर दर्शन घडते.
याच मजल्यावर मोठे बैठक कक्ष असून येथे विविध सभांचे आयोजन केले जाते.
पुढे दुसऱ्या मजल्यावरील गच्चीवर छोटे साईबाबांचे मंदिर आहे.
त्या समोर अखंड फडकणारा भगवा ध्वज आहे.
संपूर्ण मठवास्तूच्या छतावर बारा राशींचे कोरीव काम केलेले असून सभागृहातून वर पाहिल्यावर त्या स्पष्ट दिसतात.
सौरऊर्जेसाठी सोलर सेल्स बसवण्यात आले असून त्यावर मठातील विद्युत उपकरणे चालतात.
एवढ्या भव्य वास्तूमध्ये पराकोटीची स्वच्छता मनाला विशेष भावते.
संजीवनी सभागृहाच्या खाली ध्यानधारणेसाठी शांत व प्रसन्न ध्यानमंदिर आहे.
या मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीरामांचे पंचायतन आहे.
चौथऱ्याच्या डाव्या बाजूस मानसपूजा व उजव्या बाजूस रामरक्षेचा फलक आहे.
येथे मौन पाळून ध्यान करावे लागते. मौनामुळे मनातील बाह्य व्यवहार शांत होतात व ताणतणाव नाहीसे होतात अशी अनुभूती मिळते.
संजीवनी सभागृहाच्या समोरील बाजूस मठाचे कार्यालय आहे.
कार्यालयाच्या डाव्या बाजूस सद्गुरुंचे विश्रांतीस्थान असून समोर मंडळाच्या अध्यक्षांचे कार्यालय आहे.
भक्तांना उपासनेच्या मार्गावर आनंदाची अनुभूती देणाऱ्या सद्गुरुंनी स्थापन केलेल्या या मठाच्या शिखरावर पूर्णत्वाचा कळस शोभून दिसतो.
या कळसाचे पूजन श्रीमद् आद्यशंकराचार्यांच्या हस्ते झाले आहे.
अशी ही श्रीक्षेत्र नांदिवली येथील मठवास्तू डोंबिवली शहराचे भूषण ठरली आहे.