दान करा आमच्या नानफा संस्थेला समर्थन द्या जे चांगले समाज निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करते.
गुरुपौर्णिमा सारांश
|| श्री स्वामी समर्थ ||
गुरुपौर्णिमा – व्यासपौर्णिमा
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: । गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरुः साक्षात् परब्रह्म । तस्मै श्री गुरवे नम: ॥

महर्षी व्यासांपासून अविरत चालत आलेली गुरुपरंपरा सर्व जगाला माहिती आहे.

गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे ते सद्गुरु. गुरुंशिवाय जीवनाला गती नाही आणि अंती मोक्षही नाही. गुरूंचे स्थान आपल्या जीवनात अनन्य साधारण आहे.

जीवाचे जीवपण नाहीसे करून सन्मार्गाला लावणारे ते सद्गुरु. लोखंडाला परीसस्पर्श होऊन त्याचे सोने व्हावे तसेच साधकाच्या हिताकरिता योग्य मार्गदर्शन करून परमार्थाचे वाटसरू होण्यास सतत गुरुंची साधका विषयी तळमळ असते.

त्यांच्या ठायी सौजन्यशीलता, प्रसन्नता, प्रामाणिकपणा अंगीच असतो. नेमके तेच साधकाला जमावे हेच शिक्षण आयुष्यभर गुरुंकडून मिळावे म्हणजे सद्गुरुंच्या बोधाचा दिवा सतत जवळ बाळगला तर जीवनात कधीच अंधार होणार नाही.

गुरुंचा अनुग्रह झाल्याशिवाय जीवनातील इतर ज्ञानाला फारसे महत्व नाही. आपणासारिखे करिती तात्काळ या सर्व गोष्टी ज्यांनी आत्मसात करून अनेकांचे जीवन मार्गी लावले त्या महान विभूतींचे अलौकीक कार्य आपण पाहणार आहोत.

सद्गुरु चैतन्यस्वरूप भालचंद्र दत्तात्रेय लिमये (अण्णा) व सद्गुरु लाक्ष्मीस्वरुप सुषमा भालचंद्र लिमये (आई) या उभयतांनी सद्गुरु सेवेचा वारसा घालून दिला आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी दृढभावनेनी गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरु केला.

अण्णांचे सद्गुरु रावसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या चरणी सशरण्य भावाने हि परंपरा पुढे अविरत चालू ठेवली. हि वैभवशाली परंपरा आपल्या मार्ग दर्शनाने अनेक मुमुक्षूंना भक्तिमार्गाला लावून स्वामीनामाच्या गोडीने जीवन सार्थकी लावले.

सद्गुरुंच्या आत्मज्योतीशी आपली आत्मज्योत लावून भक्तांनी अनुभूती घेतली आणि आजही हीच परंपरा गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्तांना सद्गुरुंविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी अतिशय महत्वाची असते.


गुरुपौर्णिमा उत्सवाची रुपरेषा

सकाळी - ७ गणेशकृपेतून नांदिवली मठात श्री स्वामी समर्थांच्या प्रासादिक पादुकांचे आगमन. त्यानंतर पादुका स्थानापन्न झाल्यावर मोठ्या समयांच्या ज्योती प्रज्वलित करून महाराजांच्या जयजयकाराने उत्सवास प्रारंभ.

(गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सभेमध्ये चिठ्या काढून स्वामींच्या आदेशाने ज्यांची नावे आली असतील त्यांना पूजेचा मान देण्यात येतो.)
सकाळी - ७.३० ते १० महापूजा, सहस्रनामावली, मानसपूजा. चिठ्ठ्यांमध्ये ज्यांची नावे आली असतील ते दांपत्य याचे मानकरी असतात.

त्यानंतर सद्गुरु अण्णा व आई यांचे पाद्यपूजन केले जाते. त्याच वेळी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे गुरुदक्षिणा व श्रीफळ देऊन सत्कार केला जातो.

यानंतर गुरुमंत्राचा सामुहिक जप शांतपणे ध्यान मुद्रेत बसून केला जातो. सद्गुरु अण्णा व आई साधकांना योग्य मार्गदर्शन करतात.

या दिवशी गुरुंच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार करण्याची विशेष संधी भक्तांना मिळते.
दुपारी - १२ नैवेद्य व महाप्रसादास सुरुवात.
दुपारी - २.३० ते ४ मंडळातील सेवेकरी वृंद भजन, गायन किंवा विवेचनांची सेवा सद्गुरु चरणी गुरुदक्षिणा म्हणून अर्पण करतात.
संध्याकाळी - ५ मंडळातील १० वी व १२ वीच्या यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. तसेच नम्रतेने पडद्यामागे सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांचा आणि पंच्याहत्तरीतील ज्येष्ठ सेवेकऱ्यांचाही सत्कार केला जातो.
सायंकाळी - ६.३० श्रींच्या प्रासादिक पादुकांचे नांदिवली मठातून सद्गुरुंच्या निवासस्थानी आगमन.
श्री गुरुदेव प्रसन्न
|| स्वामी हो ||