डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती असलेल्या रामनगर प्रभागातील ‘श्री गोविन्दानंद श्री राम मंदिर’ आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहे.
जुनी कात टाकून नव्या तेजोमय कांतीने जसा एखादा गंधर्व उजळून निघतो तसे हे मंदिर नव्याने खूप भव्य स्वरुपात दिमाखात उभे राहिले.
वाहत्या रस्त्यावरून मंदिराच्या प्रवेशद्वाराशी आल्यानंतर लगेचच या मंदिराचे वेगळेपण मनात भरते.
भल्या मोठ्या कमानीतून आत मध्ये आल्यानंतर डाव्या हाताला नुकत्याच झालेल्या कळसपूजनाची कोनशिळा व ---------------- .
पुढे भक्तीच्या पायऱ्या चढून आपण मुख्य सभा मंडपात पोहोचतो.
रूढ मान्यतेनुसार ठराविक चौकोनी किंव्हा षटकोनी मंदिर व त्याच्या बंद भिंती या कल्पनेला तडा जातो कारण रूढ अर्थाने या सभागृहाला भिंतीच नाहीत.
सर्व प्रथम आपले लक्ष जाते ते वर टांगलेल्या भव्य मोठ्या घंटेकडे. या महाकाय घंटेमुळे होणारा घंटानाद कसा असेल असा विचार करत आपली पावले पुढे सरकतात. हा घंटानाद फक्त रात्री ९ वाजता होतो.
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सर्व प्रथम दर्शन त्या विघ्नहर्त्याचे होते.
त्यानंतर श्री आदिमाया, श्री दुर्गादेवी, श्री आदिनाथ महादेव अन्नपूर्णेसह, श्रीराम पंचायतन, श्री विठ्ठल-रखुमाई, श्री दत्तगुरू व योगेश्वर श्रीकृष्ण यांचे दर्शन घेत भक्तीचे प्रतीक असलेल्या ‘कासवाला’ स्पर्श करून आपण अनंत कोटी ब्रह्मांडनायका समोर म्हणजेच श्री स्वामी समर्थ माऊली समोर नतमस्तक होतो.
त्या तसबिरीतील त्यांचा आश्वासक चेहरा बघून मन शांत होते. “भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे” याची पुन्हा एकदा प्रचीती येते.
षटकोनी चौथऱ्यावर असलेले शिसवी लाकडातील अत्यंत देखणे मखर, अखंड तेवणारा नंदादीप, भगवा ध्वज, श्री स्वामी समर्थांच्या चांदीच्या पादुका व त्यासमोर असलेल्या संगमरवरी पादुकांकडे मन आकर्षित होते.
तृप्त मनाने त्याच्या मागील बाजूस असलेले श्री स्वामी समर्थांचे पट्टशिष्य सद्गुरू श्री बिडकर महाराज व त्यांचे शिष्य श्री बाबा म्हणजेच सद्गुरू श्री रावसाहेब सहस्त्रबुद्धे महाराज, श्री महालक्ष्मीची रेखीव तसबीर व तिथेच जागृत केलेले श्री लक्ष्मीयंत्र बघून मन उचंबळून जाते.
याच गुरुपरंपरेतील सद्गुरू श्री रावसाहेबांचे परमशिष्य म्हणजे आपल्या सर्वांचे सद्गुरू प. पू. चैतन्यस्वरूप श्री भालचंद्र दत्तात्रय लिमये उपाख्य अण्णा यांच्या तसबिरीसमोर आपोआपच नतमस्तक व्हायला होते.
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, श्री गोविन्दानंद श्रीराम मंदिर, भव्य श्री स्वामी समर्थ ग्रंथालय व नजीकच्या काळात उभा राहत असलेला “विश्वनाथ मेमोरिअल चिल्ड्रेन हॉस्पिटल” व या संस्थांकडून होत असलेले इतर सामाजिक कार्य यांचे प्रेरणास्थान असलेले हेच ते आमचे सद्गुरू श्री अण्णा.
पुढे गाभार्यातील रामपंचायतनच्या समोर असलेली श्री मारुतीची गोंडस मूर्ती दिसते.
पुढे संस्थेचे कार्यालय आहे. इथे भक्त आपल्या इच्छेनुसार विविध देवतांवर अभिषेक करू शकतात तसेच देणगी अर्पण करू शकतात.
मुख्य दरवाज्याच्या बाजूने ध्यानमंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे.
इतक्या गजबजलेल्या वस्तीत इतकी शांत जागा ध्यानाला दुसरी नाही. त्यातूनही मन विचलित झाले तर समोरच्या श्रीराम, श्रीलक्ष्मण, श्री सीतामाई यांच्या मूर्तीकडे बघून मनाला अथांग शांतता लाभते.
तिथे घटकाभर बसून पुन्हा पायऱ्या चढून आपण मुख्य गाभाऱ्यात वर येत असताना जिन्यात श्रीरामरायाच्या ध्यानमंदिरातील चौथऱ्यात ज्या विविध वस्तू ठेवल्या आहेत त्याचा एक रेखीव फलक लावण्यात आला आहे.
या वरील पहिल्या मजल्यावर संस्थेचे भव्य व सुसज्ज असे ग्रंथालय आहे.
मुख्यत: धार्मिक तसेच सामाजिक, सांस्कृतिक, महिलांसाठी व लहान मुलांसाठी पुस्तकांचा व ज्ञानाचा खजिना येथे उपलब्ध आहे.
अगदी चारही वेद व उपनिषदांपासून डॉ. जयंत नारळीकर यांच्या वैज्ञानिक पुस्तकांपर्यंत विविधता येथे दिसून येते.
बाहेरच वर्तमानपत्रे वाचण्यासाठी वेगळी राखीव जागा आहे.
वाचनालयात प्रवेश करण्याआधी सद्गुरू आई-अण्णांचे भव्य काचेचे विश्रांतिस्थान आहे.
दुसऱ्या मजल्यावर सद्गुरू श्री अण्णांच्या इच्छेनुसार विश्वनाथ मेमोरिअलची मुहूर्तमेढ म्हणून Medical O.P.D. ची सर्व जय्यत तयारी झाली आहे.
थोड्याच दिवसात या --------- उद्घाटन होईल व गरजूंना वैद्यकीय सेवा सुरु होईल.
इथे नेत्राविशारद, दंत चिकित्सक, अस्थीरोगतज्ञ, मधुमेह तज्ञ अशा अनेक डॉक्टरांच्या केबिन तयार आहेत.
विशेष गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून “उद्वाहकाची” सोय करण्यात आली आहे.
त्यावरील तिसऱ्या मजल्यावर एक भव्य सभागृह आहे. येथे वैद्यकीय शिबिरे, व्याख्यानमाला यांचे आयोजन केले जाते.
याच्या वरच्या मजल्यावर गच्ची असून पर्यावरणाचा विचार करून सौरऊर्जेचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.
आणि या सगळ्याच्या वर कळस आहे, ज्याची स्थापना श्रीमद् शंकराचार्यांच्या हस्ते झाली आहे.
आपल्या हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे येथेही मंदिराच्या मागील बाजूस एक भव्य मोठा वटवृक्ष आहे. येथे सायंकाळी दीप लावला जातो.
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी राष्ट्रीय कीर्तनकार श्री गोविन्दानंद स्वामी आफळे यांनी श्री गोविन्दानंद श्रीराम मंदिर स्थापन केले.
वाढत्या वयामुळे त्यांना मंदिराची काळजी वाटत होती.
प. पु. सद्गुरू श्री अण्णांच्या स्वाधीन हे मंदिर करत असताना त्यांनी काढलेले उद्गार खूपच समर्पक आहेत — “आपली मुलगी सुस्थळी गेल्याचा वडिलांना जो आनंद व समाधान होते तोच आनंद आज मला होत आहे.”
प.पु. सद्गुरू श्री अण्णांनी व त्यांनी निर्माण केलेल्या अनेक सेवेकऱ्यांनी अक्षरशः तन, मन, धन अर्पून निव्वळ तीन वर्षात एका जुन्या पत्र्याच्या मंदिराचे एका भव्य मंदिरात रुपांतर केले.
अर्थात या सगळ्यामध्ये हजारो भक्तांनी उचललेला खारीचा वाटा व श्री स्वामी समर्थ व श्री प्रभूरामांनी दिलेले भरभरून आशीर्वाद यांमुळेच हे शिवधनुष्य उचलणे शक्य झाले आहे.